Welcome to Deepsagar News   Click to listen highlighted text! Welcome to Deepsagar News
Uncategorized

कोंढव्यात बेकायदेशीर खाजगी सावकारीचा पर्दाफाश; रिपब्लिकन परिवर्तन सेनेच्या पाठपुराव्यानंतर ५ जणांवर गुन्हा दाखल

    दिपसागर न्यूज ऑनलाईन पोर्टल सेवा:

पुणे कोंढवा (प्रतिनिधी): पुण्यातील कोंढवा परिसरात अवैध सावकारीच्या जाचाला कंटाळलेल्या एका कष्टकरी कुटुंबाला अखेर न्याय मिळाला आहे. रिपब्लिकन परिवर्तन सेनेचे अध्यक्ष विजयसिंह गायकवाड यांच्या खंबीर पाठपुराव्यामुळे आणि पुणे पोलीस आयुक्तांच्या थेट आदेशामुळे, कोंढवा पोलिसांनी सराईत सावकार टोळीवर गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

काय आहे नेमकी हकीगत?
कोंढव्यातील काकडे वस्ती (गल्ली क्र. २) येथील रहिवासी वर्षा किशोर कांबळे यांनी घरगुती गरजेसाठी २० हजार रुपये व्याजाने घेतले होते. पीडित महिलेने ही रक्कम व्याजासह तब्बल १ लाख ४ हजार रुपयांपर्यंत परत केली होती. तरीही आरोपींची पैशांची हाव संपली नव्हती. आरोपींनी २० टक्के दराने बेकायदेशीर व्याजाची मागणी करत पीडितेला सतत मानसिक व शारीरिक त्रास देण्यास सुरुवात केली होती.

घरात घुसून शस्त्रांचा धाक आणि छेडछाड
दिनांक २८ फेब्रुवारी  रात्री आरोपींनी सर्व मर्यादा ओलांडल्या. आरोपी सावित्री गायकवाड, विकास गायकवाड, नताशा गायकवाड, पायल गायकवाड आणि त्यांच्या दोन गुंडांनी हातात लोखंडी पाईप, कोयता व इतर धारदार हत्यारे घेऊन पीडित महिलेच्या घरात बेकायदेशीरपणे घुसखोरी केली. “पैसे दे नाहीतर संपूर्ण कुटुंबाला जीवे मारू” अशी धमकी देत त्यांनी घरात दहशत निर्माण केली. यावेळी मद्यधुंद अवस्थेत असलेल्या आरोपींनी पीडित महिलेच्या तरुण मुलीशी गैरवर्तन करून तिची छेड काढली.

विजयसिंह गायकवाड यांच्या पाठपुराव्याची पोलीस आयुक्तांनी घेतली दखल
या गंभीर प्रकारानंतर पीडित महिला वारंवार कोंढवा पोलीस ठाण्यात दाद मागायला जात होत्या. मात्र, पोलिसांनी दखलपात्र गुन्हा नोंदवण्याऐवजी केवळ ‘एनसी’ (अदखलपात्र गुन्हा) दाखल करून घेतली होती. हतबल झालेल्या महिलेने रिपब्लिकन परिवर्तन सेनेचे अध्यक्ष विजयसिंह गायकवाड यांची भेट घेतली. गायकवाड यांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पुणे पोलीस आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनाचे पत्र दिले. आंदोलनाच्या एक दिवस आधी त्यांनी स्वतः पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि सह-पोलीस आयुक्त रंजन शर्मा यांना फोन करून कोंढवा पोलीस ठाण्यातील उदासीनतेबाबत माहिती दिली.

आंदोलनापूर्वीच पोलिसांची कारवाई
पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतर कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे यांनी तातडीने सूत्रे हलवली. आंदोलनाचा दिवस उजाडण्यापूर्वीच पोलिसांनी सराईत सावकारांविरुद्ध विनयभंग, जिवे मारण्याची धमकी, घरात घुसून मारहाण आणि महाराष्ट्र सावकारी (नियमन) कायद्यांतर्गत गुन्हा (FIR) दाखल केला.

अन्यायाविरुद्ध लढणे हाच आमचा धर्म आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आमचे म्हणणे गांभीर्याने ऐकून घेतले आणि तात्काळ कारवाईचे आदेश दिले, त्याबद्दल प्रशासनाचे आभार. रिपब्लिकन परिवर्तन सेना यापुढेही अशा बेकायदेशीर खाजगी सावकारी पाशातून गोरगरिबांची मुक्तता करण्यासाठी आणि सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी ताकदीने कटिबद्ध राहील.”
विजयसिंह गायकवाड (अध्यक्ष, रिपब्लिकन परिवर्तन सेना)

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!