दक्षिण पुण्याचा पाणीप्रश्न सुटणार: कोंढवा, उंड्री, महंमदवाडीसाठी ठोस तोडगा दृष्टिपथात
महापालिकेच्या समान पाणीपुरवठा योजनेचे काम ९०% पूर्ण झाले असून, यामुळे सुमारे ४ लाख नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

दिपसागर न्यूज ऑनलाईन पोर्टल सेवा:
पुणे शहर :(प्रतिनिधी) कोंढवा, उंड्री, महंमदवाडी या पुण्याच्या दक्षिण भागामध्ये राहणाऱ्या नागरिकांना पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या भागासाठी महापालिकेच्या वतीने हाती घेण्यात आलेली ‘समान पाणीपुरवठा योजना’ अंतिम टप्प्यात आल्याने या परिसरात राहणाऱ्या सुमारे चार लाख नागरिकांची तहान यामुळे भागणार आहे.
कोंढवा, महंमदवाडी या भागाचा विकास अत्यंत झपाट्याने होत आहे. या भागात मोठ्या प्रमाणात गृहप्रकल्प झाल्याने पाण्याची गरज भागविण्यासाठी नागरिकांना गेली अनेक वर्षे खासगी टँकरवरच अवलंबून राहावे लागत आहे. या भागातील नागरिकांना सुरळीत आणि समान पाणी मिळावे, यासाठी येथे समान पाणीपुरवठा योजनेचे काम महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने सुरू केले होते. या प्रकल्पाच्या माध्यमातून या परिसरात मोठ्या प्रमाणावर जलवाहिन्या, जलसाठे आणि वितरण यंत्रणा उभारण्यात आली असल्याचे अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी सांगितले.
सध्या २३ किलोमीटर लांबीच्या मुख्य जलवाहिनीपैकी १९ किलोमीटर मार्गावर १ मे २०२६ रोजी पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असून, दोराबजी पॅराडाइज परिसरातील तीन टाक्यांपर्यंत पाणी पोहोचले आहे. उर्वरित चार किलोमीटर जलवाहिनी आणि पाण्याच्या पाच टाक्यांची कामे येत्या १० मेपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यानंतर नव्याने टाकण्यात आलेल्या वितरण जलवाहिन्यांद्वारे टप्प्याटप्प्याने घरगुती पाणीपुरवठा सुरू होणार आहे. या प्रकल्पामुळे दररोज सुमारे ६०० टँकरची गरज कमी होणार आहे, असा दावा पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केला
अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर म्हणाल्या, हा प्रकल्प राबविताना महापालिका प्रशासनाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. भूसंपादन, वीज खांबांचे स्थलांतर, वाहतुकीचे प्रश्न अशा समस्या होत्या. या सर्व अडथळ्यांवर मात करून हे काम पूर्णत्वास गेले आहे. या भागातील नागरिकांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळणार असून, टँकरने पाणी घेण्याची गरज भासणार नाही.
प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये
एकूण १७ दशलक्ष लिटर क्षमतेच्या पाण्याच्या ८ उंच टाक्या.
२३ किमी लांबीची मुख्य जलवाहिनी.
३३ किमी नवीन वितरण जाळे.
पाण्याच्या ८ टाक्यांपैकी ३ टाक्यांमध्ये पाणी साठवण सुरू.
२३ किमी मुख्य जलवाहिनीपैकी १९ किमी कार्यान्वित.
सुमारे ४ लाख नागरिकांना लाभ.
दररोज ६०० टँकरची गरज कमी होणार.




