Uncategorized

कोंढवा बुद्रुकमध्ये अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट; महापालिका प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष, नागरिकांमध्ये संताप

पुणे | दिपसागर न्यूज नेटवर्क.

पुणे कोंढवा बुद्रुक :महापालिका हद्दीतील कोंढवा बुद्रुक परिसरात अनधिकृत आणि बेकायदेशीर बांधकामांनी थैमान घातले असून, पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विकास विभागाच्या दुर्लक्षामुळे या बेकायदा बांधकामांना खतपाणी मिळत असल्याचा गंभीर आरोप होत आहे. कोणत्याही प्रकारची शासकीय परवानगी अथवा मंजूर नकाशा नसताना केवळ स्वतःच्या मालकीची जागा असल्याचे कारण सांगून राजरोसपणे स्लॅब आणि मजले उभारले जात आहेत.

या गंभीर प्रकाराबाबत दि. १६ सप्टेंबर २०२६ रोजी पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विकास विभाग, झोन क्रमांक २, सावरकर भवन येथील उप अभियंता यांच्याकडे रीतसर लेखी तक्रार दाखल करण्यात आली असून, सोबत बेकायदेशीर बांधकामाचे छायाचित्रे आणि पुरावे सादर करण्यात आले आहेत.

प्रशासनाच्या नाकावर टिच्चून बांधकाम सुरूच

तक्रारीत नमूद केल्यानुसार, ही बेकायदेशीर बांधकामे या ठिकाणी सुरू आहेत.

सर्व्हे नं. ५,गल्ली नंबर १ आश्रफ नगर, गौतम बुद्ध सोसायटी , महानगरपालिका क्रीडांगणा लगत, कोंढवा बुद्रुक पुणे.

दिपसागर न्यूज चे प्रतिनिधी यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन  पाहणी केली असता, सदर ठिकाणी कोणतेही परवानगी फलक लावलेले नाहीत. महापालिकेच्या नियमानुसार बांधकाम सुरू करण्यासाठी कोणतीही परवानगी मंजूर नकाशा नाही तसेच बांधकाम सुरू  करण्यापूर्वी परवानगी फलक लावणे बंधनकारक असताना, या ठिकाणी सर्व नियम धाब्यावर बसवले गेले आहेत. दिवसाढवळ्या सुरू असलेले हे बांधकाम पाहून प्रशासनाला ते दिसत कसे नाही, असा सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत.

अधिकारी आणि राजकीय वरदहस्ताचा संशय

कोंढवा बुद्रुक, काकडे वस्ती, गौतम बुद्ध सोसायटी परिसरात गेल्या काही महिन्यांपासून अनधिकृत बांधकामांचे प्रमाण असामान्य पद्धतीने वाढले आहे. एकाच वेळी अनेक ठिकाणी बेकायदा बांधकामे सुरू असताना क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी आणि बीट निरीक्षक यांना त्याची माहिती नसणे अशक्य आहे.

त्यामुळे या बांधकामांमागे संबंधित अधिकाऱ्यांचे आर्थिक हितसंबंध आहेत का? स्थानिक पातळीवरील काही माजी नगरसेवक आणि राजकीय कार्यकर्त्यांचा या बांधकाम व्यावसायिकांना आशीर्वाद आहे का? कोणाच्या वरदहस्तामुळे ही बांधकामे बिनधास्तपणे सुरू आहेत, याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.

नागरिकांचे म्हणणे आहे की, अशा बेकायदा बांधकामांमुळे अधिकृतपणे कर भरणाऱ्या नागरिकांवर अन्याय होत असून, भविष्यात पाणी पुरवठा, मलनिस्सारण आणि रस्ते या मूलभूत सुविधांवर ताण येणार आहे. तसेच रहिवाशांच्या जीवितालाही धोका निर्माण होऊ शकतो.

तात्काळ कारवाईची मागणी

या पार्श्वभूमीवर, तक्रारदाराने महापालिका प्रशासनाकडे मागणी केली आहे की, नमूद ठिकाणच्या अनधिकृत बांधकामांची तात्काळ संयुक्त पाहणी करून, संबंधितांवर महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियमांतर्गत कठोर कारवाई करावी आणि चालू असलेले बांधकाम तात्काळ थांबवावे. जर प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले, तर या विरोधात लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

आता या तक्रारीनंतर महापालिका प्रशासन खडबडून जागे होते का आणि संबंधितांवर कारवाईचा बडगा उगारते का, याकडे संपूर्ण कोंढवा बुद्रुक परिसराचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!