पुण्यात आरटीओच्या बनावट चलनातून व्यावसायिकाची सायबर फसवणूक; जवळपास तीन लाखांचा अपहार

दिपसागर न्यूज ऑनलाईन पोर्टल सेवा:
पुणे शहर (मार्केट यार्ड)प्रतिनिधी : वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याचा बनावट दावा करत आरटीओच्या नावाने पाठविण्यात आलेल्या खोट्या चलनाच्या आधारे एका व्यावसायिकाची ऑनलाइन फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या सायबर गुन्ह्यात संबंधित व्यावसायिकाच्या बँक खात्यातून तब्बल २ लाख ९५ हजार रुपये काढण्यात आले.
या संदर्भात मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, सायबर पोलिसांकडून तपास सुरू आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी (वय ४७) हे मार्केट यार्ड परिसरातील वर्धमानपुरा सोसायटीत वास्तव्यास आहेत. त्यांच्या मोबाईलवर वाहतूक नियमभंग केल्याचे कथित ई-चलन एपीके (APK) फाईलच्या स्वरूपात पाठविण्यात आले. चलनावर आरटीओचा उल्लेख असल्याने ते अधिकृत असल्याचा भास झाला आणि त्यांनी ती फाईल उघडली.
फाईल उघडल्यानंतर त्यात वाहनाची माहिती व दंडाची रक्कम नमूद होती. सुरुवातीला केवळ १० रुपये भरून पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगण्यात आले. त्यानंतर विविध कारणे सांगून संबंधितांकडून बँक खात्याशी संबंधित गोपनीय माहिती मिळविण्यात आली. ही माहिती मिळाल्यानंतर सायबर चोरट्यांनी त्यांच्या खात्यातून एकूण २ लाख ९५ हजार रुपये परस्पर काढून घेतले.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच व्यावसायिकाने तातडीने मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात सायबर गुन्हेगारांविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
दरम्यान, अलीकडच्या काळात वाहतूक चलन, थकीत वीज बिल, एमएनजीएल गॅस देयक किंवा इतर शासकीय देयकांच्या नावाखाली एपीके फाईल किंवा संशयास्पद लिंक पाठवून फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. नागरिकांनी अनोळखी क्रमांकावरून आलेल्या फाईल्स किंवा लिंक उघडू नयेत, तसेच बँक खात्याची कोणतीही गोपनीय माहिती कोणालाही देऊ नये, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.



