कात्रज–कोंढवा रस्ता पुन्हा रखडला! सात वर्षांची प्रतीक्षा कायम; आता मार्च २०२७ची नवी मुदत
जूनची मुदतही फसली; वाहतूक कोंडी, धूळ आणि खड्ड्यांनी नागरिक हैराण

दिपसागर न्यूज ऑनलाईन पोर्टल सेवा:
पुणे (प्रतिनिधी) : शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या कात्रज–कोंढवा रस्ता रुंदीकरण प्रकल्पाला पुन्हा एकदा विलंब झाला आहे. महापालिकेने यापूर्वी जून २०२६ अखेरपर्यंत काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ती मुदतही संपून गेली असून आता हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे नवे लक्ष्य प्रशासनाने निश्चित केले आहे. तब्बल सात वर्षांपासून रखडलेल्या या कामामुळे दररोज हजारो वाहनचालकांना वाहतूक कोंडी, धुळीचे प्रदूषण आणि खड्डेमय रस्त्यांचा त्रास सहन करावा लागत आहे.
महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी नुकतीच या प्रकल्पाचा आढावा घेतला. बैठकीत कात्रज ते खडी मशिन चौक या टप्प्यातील काम मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले. उर्वरित भूसंपादनाची प्रक्रिया लवकर पूर्ण होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
८४ मीटरच्या ऐवजी ५० मीटर रुंदीचा निर्णय
सन २०१७ मध्ये सुरू झालेल्या या प्रकल्पात सुरुवातीला ८४ मीटर रुंदीचा रस्ता प्रस्तावित होता. मात्र, भूसंपादनातील अडथळे, प्रशासकीय प्रक्रिया आणि नियोजनातील बदल यामुळे प्रकल्पाला मोठा विलंब झाला. त्यामुळे पहिल्या टप्प्यात रस्त्याची रुंदी ५० मीटर करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या १०९ मिळकतींपैकी ८४ मिळकती महापालिकेच्या ताब्यात आल्या आहेत. उर्वरित २५ मिळकतींचे भूसंपादन सुरू असून ते लवकर पूर्ण होईल, असा प्रशासनाचा दावा आहे.
कोंडीचा प्रश्न कायमच
कात्रज–कोंढवा मार्ग हा शहरातील अत्यंत महत्त्वाचा आणि गर्दीचा मार्ग आहे. अपूर्ण रुंदीकरण, अरुंद रस्ता, मोठमोठे खड्डे आणि उडणारी धूळ यामुळे नागरिकांचा प्रवास दिवसेंदिवस अधिक त्रासदायक होत आहे. या मार्गावरून दररोज हजारो वाहने धावत असल्याने वाहतूक कोंडी ही नित्याचीच समस्या बनली आहे.
भूसंपादनासाठी धोरणात बदल
प्रारंभी ‘टीडीआर’ आणि ‘एफएसआय’च्या माध्यमातून भूसंपादन करण्याचे नियोजन होते. मात्र, अनेक जागामालकांनी रोख मोबदल्याची मागणी केल्यामुळे महापालिकेला धोरणात बदल करावा लागला. जिल्हाधिकारी आणि राज्य शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर एप्रिलपासून रोख मोबदल्याद्वारे भूसंपादनाला गती देण्यात आली आहे. या प्रक्रियेद्वारे सुमारे ४४ हजार चौरस मीटर जागा महापालिकेच्या ताब्यात येणार असून, त्यानंतर उर्वरित रुंदीकरणाचे काम वेगाने पूर्ण करण्याचा प्रशासनाचा मानस आहे.
प्रकल्पाची महत्त्वाची माहिती
- रस्त्याची लांबी : सुमारे ३.५ कि.मी. (कात्रज ते खडी मशिन चौक)
- प्रकल्पाची सुरुवात : २०१७
- मूळ प्रस्तावित रुंदी : ८४ मीटर
- सध्या मंजूर रुंदी : ५० मीटर
- एकूण मिळकती : १०९
- ताब्यात आलेल्या मिळकती : ८४
- प्रलंबित मिळकती : २५
- नवीन पूर्णत्वाची मुदत : मार्च २०२७
वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपायांची गरज
पुणे शहरात मेट्रो मार्गिका, रिंग रोड, उच्च क्षमता वर्तुळाकार मार्ग यांसारखे अनेक मोठे पायाभूत प्रकल्प सुरू असले तरी विविध कारणांमुळे त्यांची कामे रखडत आहेत. त्यामुळे वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हे प्रकल्प वेळेत पूर्ण करणे, पर्यायी रस्ते विकसित करणे आणि प्रभावी वाहतूक नियोजन राबविणे ही काळाची गरज असल्याचे नागरिकांचे मत आहे.




