| सॅलिसबरी पार्क मार्केट यार्ड – प्रभाग 21 मध्ये पैशांचा पाऊस?”

- दिपसागर न्यूज ऑनलाईन पोर्टल सेवा:
पुणे शहर मार्केट यार्ड (प्रतिनिधी) मुकुंदनगर – सॅलिस्बरी पार्क (मार्केट परिसर), पुणे
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 21 (मुकुंदनगर–सॅलिस्बरी पार्क) येथे एक अत्यंत धक्कादायक व लोकशाहीला घातक ठरू शकणारा प्रकार समोर येत आहे. वर्षानुवर्षे सत्ता भोगलेल्या आणि सत्तेच्या जोरावर प्रचंड आर्थिक बळ उभे केलेल्या एका प्रस्थापित उमेदवाराकडून थेट मतदारांना पैशांच्या जोरावर प्रभावित करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिक आणि राजकीय वर्तुळात जोर धरू लागला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, प्रत्येक मतदाराला तब्बल दीड हजार रुपये देण्यात येत असल्याचे पाकिट वाटपाचे प्रकार सॅलिस्बरी पार्क मार्केट परिसरात सुरू असल्याची चर्चा उघडपणे होत आहे. या कथित प्रकारामुळे केवळ निवडणूक प्रक्रियेवरच नव्हे, तर संपूर्ण लोकशाही व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
“सत्ता → पैसा → पुन्हा सत्ता” हेच गणित?
सत्तेचा वापर करून मोठ्या प्रमाणावर आर्थिक लाभ मिळवणाऱ्या या उमेदवाराने आता तोच पैसा पुन्हा सत्तेसाठी वापरण्याचा गैरवापर सुरू केला असल्याचा आरोप केला जात आहे. “कुणी कितीही काही केले तरी हा उमेदवारच जणू मतदार विकत घेत आहे” अशी चर्चा नागरिकांमध्ये ऐकू येत आहे.
“परत मलाच सत्ता पाहिजे” या हट्टापोटी लाखो रुपये नव्हे तर जणू मतदारांवर कोट्यवधींचा सट्टा लावल्यासारखी परिस्थिती निर्माण झाल्याची संतप्त भावना मतदार व्यक्त करत आहेत.
लोकशाहीसाठी किती भयानक वास्तव?
निवडणूक म्हणजे जनतेचा कौल; पण जर कौलच पैशात मोजला जात असेल, तर हे वास्तव किती भयानक आणि लोकशाहीसाठी किती घातक आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रकारावर विरोधी उमेदवारांकडून अद्याप ठोस प्रतिक्रिया किंवा आवाज उमटत नसल्याने “विरोधी उमेदवारसुद्धा विकत घेतला गेला आहे का?” अशी दबक्या आवाजात चर्चा रंगू लागली आहे.
पैशांपुढे मत विकायचे की लोकशाही वाचवायची?
हा प्रश्न आता केवळ निवडणूक लढवणाऱ्यांपुरता मर्यादित राहिलेला नसून, प्रभाग क्रमांक 21 मधील प्रत्येक जागरूक मतदारासमोर उभा ठाकला आहे. निवडणूक आयोग व संबंधित यंत्रणांनी या कथित प्रकाराची तातडीने दखल घेऊन सखोल चौकशी करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.



