अपघातांना आळा घालण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांची कडक मोहीम; नियम मोडल्यास दुचाकी थेट जप्त!

दिपसागर न्यूज ऑनलाईन पोर्टल सेवा:
पुणे शहर प्रतिनिधी : पुणे वाहतूक पोलीस यांनी रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी कारवाई अधिक तीव्र केली आहे. विशेषतः एकाच दुचाकीवरून तिघांनी प्रवास करणे (ट्रिपल सीट), भरधाव वाहन चालवणे तसेच इतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांविरोधात कडक पावले उचलण्यात येत आहेत.
गेल्या दोन दिवसांत नियम मोडणाऱ्या तब्बल २,६४९ दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली असून, त्यापैकी ९८८ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईतून सुमारे २१ लाख ३७ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
भरधाव व बेदरकार वाहनचालकांमुळे गंभीर अपघात घडत असल्याचे लक्षात घेऊन पोलिसांनी ही मोहीम अधिक प्रभावी केली आहे. विशेषतः ट्रिपल सीटसारख्या धोकादायक प्रकारांवर पोलिसांचा कटाक्ष आहे.
जप्त करण्यात आलेल्या दुचाकी कागदपत्रांची पूर्तता आणि थकीत दंड भरल्यानंतर टप्प्याटप्प्याने परत दिल्या जाणार आहेत, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिली.
आतापर्यंत राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमांमधून ट्रिपल सीट आणि अन्य वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांकडून एकूण एक कोटी तीन लाख २५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.




