पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कोंढवा शाखेचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात! मूळ नोंदणी प्रमाणपत्राशिवाय सोसायट्यांची खाती उघडल्याचा संशय; लाखोंच्या व्यवहारांना परवानगी कशी?

पुणे | दिपसागर न्यूज नेटवर्क
कोंढवा:-(प्रतिनिधी) पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कोंढवा शाखेतील कामकाजाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. कोंढवा बुद्रुक, टिळेकरनगर व येवलेवाडी परिसरातील काही गृहनिर्माण सहकारी संस्थांची बँक खाती उघडताना मूळ नोंदणी प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात आली होती का, याबाबत संशय व्यक्त केला जात आहे.
सोसायटी नोंदणी चे मूळ प्रमाणपत्र नसताना सोसायटीच्या नावाने पॅन कार्ड तयार करण्यात आले, व इतर आवश्यक कागदपत्रे सादर करण्यात आली; मात्र बिल्डरकडून सोसायटीचे मूळ नोंदणी प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात आलेले नसताना केवळ झेरॉक्स प्रतीच्या आधारे खाते उघडण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर या खात्यांवर लाखो रुपयांचे आर्थिक व्यवहार सुरू असल्याने बँकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मूळ नोंदणी प्रमाणपत्राची पडताळणी न करता खाते उघडलेच कसे?
सोसायटीचे मूळ नोंदणी प्रमाणपत्र उपलब्ध नसताना केवळ झेरॉक्स प्रतीच्या आधारे खाते उघडण्यास शाखा व्यवस्थापकांनी कोणत्या नियमांच्या आधारे परवानगी दिली? संबंधित कागदपत्रांची सत्यता आणि सोसायटीच्या नोंदणीची अधिकृत पडताळणी करण्यात आली होती का? खाते उघडल्यानंतर एवढ्या मोठ्या आर्थिक व्यवहारांना परवानगी देण्यापूर्वी आवश्यक तपासणी करण्यात आली होती का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
सोसायटीच्या नावाने पॅन कार्ड आणि संबंधितांचे आधार कार्ड आणि सोसायटीचा ठराव उपलब्ध असणे एवढेच खाते उघडण्यासाठी पुरेसे आहे का? सोसायटीची कायदेशीर नोंदणी आणि तिचे अधिकृत अस्तित्व सिद्ध करणाऱ्या कागदपत्रांची खातरजमा करणे ही बँकेची जबाबदारी नाही का? मग या प्रकरणात बँकेने नेमकी कोणती पडताळणी केली, हे स्पष्ट होणे गरजेचे आहे.
बँकेच्या अधिकाऱ्यांचा नेमका उद्देश काय? सखोल चौकशीची मागणी!
या संपूर्ण प्रकरणात केवळ खाते उघडण्याची प्रक्रिया तपासून चालणार नाही, तर संबंधित शाखा व्यवस्थापकांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची भूमिका आणि निर्णय प्रक्रियाही तपासणे आवश्यक आहे. मूळ नोंदणी प्रमाणपत्र नसताना खाते उघडण्यास परवानगी देण्यामागे नेमका कोणता आधार होता? आवश्यक पडताळणी न करता आर्थिक व्यवहार सुरू करण्यास मान्यता देण्यामागे काही विशेष हितसंबंध किंवा आर्थिक संगनमत होते का? याची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
कोंढवा बुद्रुक, टिळेकरनगर व येवलेवाडी परिसरातील आणखी किती गृहनिर्माण सहकारी संस्थांची खाती मूळ नोंदणी प्रमाणपत्रांची योग्य पडताळणी न करता उघडण्यात आली आहेत, याचीही सखोल तपासणी व्हावी. संबंधित सर्व खात्यांची कागदपत्रे, खाते उघडण्यास मंजुरी देणारे अधिकारी, KYC प्रक्रिया आणि झालेल्या आर्थिक व्यवहारांची तपासणी करण्यात यावी.
सभासदांच्या मेंटेनन्सचे लाखो रुपये सुरक्षित आहेत का? जबाबदारी कोण घेणार?
गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या बँक खात्यांमध्ये दर महिन्याला सभासदांकडून जमा होणारे मेंटेनन्सचे पैसे, सोसायटीच्या दैनंदिन देखभालीसाठी जमा होणारी रक्कम तसेच इतर आर्थिक निधीचे व्यवहार केले जातात. अशा परिस्थितीत ज्या खात्याच्या उघडण्याच्या प्रक्रियेतच मूळ नोंदणी प्रमाणपत्राची पडताळणी झाल्याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत, त्या खात्यात जमा होणाऱ्या सभासदांच्या कष्टाच्या पैशांची सुरक्षितता नेमकी किती विश्वासार्ह आहे?
भविष्यात या खात्यात सभासदांकडून दर महिन्याला जमा होणारी मेंटेनन्सची रक्कम तसेच जमा झालेला लाखो रुपयांचा निधी काढण्यावर बँकेकडून किंवा RBI च्या निर्देशानुसार काही निर्बंध आले, अथवा मूळ नोंदणी कागदपत्रांची आणि आवश्यक KYC प्रक्रियेची पूर्तता न करता खाते उघडल्याचे चौकशीत निष्पन्न झाले, तर सभासदांच्या या लाखो रुपयांची जबाबदारी कोण घेणार?
खाते उघडण्यास परवानगी देणारे शाखा व्यवस्थापक, संबंधित बँक अधिकारी आणि खाते उघडण्यासाठी पुढाकार घेणारे सोसायटीचे पदाधिकारी सभासदांच्या पैशांची जबाबदारी स्वीकारणार का? सभासदांच्या कष्टाच्या पैशांबाबत भविष्यात कोणतीही आर्थिक अडचण किंवा अनिश्चितता निर्माण झाल्यास संबंधितांना जबाबदारीतून पळ काढता येणार नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात बँक अधिकारी आणि संबंधित पदाधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जबाबदारी निश्चित करावी!
या प्रकरणात पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून कोंढवा शाखेतील खाते उघडण्याच्या प्रक्रियेची सखोल चौकशी करावी. संबंधित शाखा व्यवस्थापकांसह जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांची भूमिका तपासून दोष आढळल्यास कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येणार आहे.
या प्रकरणी रिपब्लिकन परिवर्तन सेना महाराष्ट्र राज्य तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीने पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य कार्यालय, पुणे यांच्याकडे निवेदन देण्यात येणार असून, योग्य चौकशी व कारवाई न झाल्यास मुख्य कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात येणार असल्याचे दोन्ही संघटनांच्या वतीने कळविण्यात आले आहे.
सामान्य नागरिकांसाठी कठोर नियम आणि सोसायट्यांच्या खात्यांसाठी वेगळे निकष?
सामान्य नागरिकाला खाते उघडताना मूळ कागदपत्रे सादर करण्यास सांगितले जाते. मग गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या बाबतीत मूळ नोंदणी प्रमाणपत्राची खातरजमा न करता खाते उघडण्यास आणि लाखो रुपयांचे व्यवहार करण्यास परवानगी कशी मिळाली? हा केवळ एका खात्याचा प्रश्न नसून बँकेच्या पारदर्शक कारभाराचा आणि आर्थिक शिस्तीचा प्रश्न आहे. बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गंभीर प्रश्नांची उत्तरे देऊन वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी होत आहे.
आता बँकेचे वरिष्ठ अधिकारी या प्रकरणाची दखल घेऊन चौकशी करतात की कोंढवा शाखेतील कारभाराकडे दुर्लक्ष करतात, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.




