Uncategorized

महापालिका आयुक्तांच्या आश्वासनाला भूसंपादनाचा ब्रेक; कात्रज-कोंढवा रस्ता मार्च 2027 मध्ये पूर्ण होणार?

दिपसागर न्यूज नेटवर्क:

  पुणे (प्रतिनिधी) :-  कात्रज ते कोंढवा या अत्यंत महत्त्वाच्या ५० मीटर रुंद रस्त्याचे काम पुन्हा एकदा भूसंपादनाच्या कचाट्यात अडकले आहे. महापालिका आयुक्तांनी हा रस्ता मार्च २०२७ अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले असले तरी, प्रत्यक्षात जागेवरील १० मिळकतींचा तिढा सुटलेला नाही. त्यामुळे आयुक्तांचे आश्वासन पूर्ण होण्याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.

महापालिकेच्या पथ विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या रस्त्यासाठी लागणाऱ्या उर्वरित १० मिळकतींचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. मात्र, त्यांची प्रत्यक्ष मोजणीच अद्याप झालेली नाही. मागील अनुभव पाहता केवळ मोजणी, त्यानंतरचा नवीन निवाडा जाहीर करणे आणि इतर प्रशासकीय सोपस्कार पूर्ण करण्यासाठी किमान ३ ते ४ महिने लागू शकतात.

रस्त्याच्या मधोमध असलेल्या मिळकतींमुळे पथ विभागाला सेवा रस्ता (Service Road) देखील पूर्णपणे खुला करता येत नाहीये. सेवा रस्ता बंद असल्याने सर्व वाहतुकीचा भार मुख्य रस्त्यावर पडत असून, त्यामुळे मुख्य रस्त्याच्या कामाचा वेगही मंदावला आहे.

सुंदरबन आणि माऊलीनगर हा मोठा अडथळा

सर्वात मोठा अडथळा आहे तो सुंदरबन सोसायटी परिसरातील मिळकती आणि माऊलीनगर चौकातील ४ पक्की बांधकामे. याच ठिकाणी प्रस्तावित ग्रेड सेपरेटर आणि पूल होणार आहे. जोपर्यंत या मिळकती ताब्यात येऊन जागा मोकळी होत नाही, तोपर्यंत ग्रेड सेपरेटरचे काम सुरूच होऊ शकत नाही. त्यामुळे या कामाला नेमका किती वेळ लागेल, याबाबत प्रशासनाकडेही ठोस उत्तर नाही.

सेवा रस्त्याचे काम ६० टक्के पूर्ण

दरम्यान, या रस्त्यालगतच्या सेवा रस्त्याचे सुमारे ६० टक्के काम पूर्ण झाले आहे. सुंदरबन आणि माऊलीनगर वगळता उर्वरित सेवा रस्ता पुढील एका महिन्यात पूर्ण करण्याचा पथ विभागाचा प्रयत्न आहे. जर सेवा रस्ता पूर्ण क्षमतेने सुरू झाला, तर कात्रज-कोंढव्यातील वाहतूक कोंडी काही प्रमाणात कमी होईल. पण अंतिमतः संपूर्ण रस्त्याचे भवितव्य हे भूसंपादनाच्या वेगावरच अवलंबून आहे.

“जिल्हाधिकारी कार्यालयाकडून भूसंपादनाचा प्रस्ताव आम्हाला मिळाला आहे. आम्ही मोजणी विभागाशी पत्रव्यवहार केला असून हे काम तातडीने करण्याबत कळवले आहे. नोटीस काढून मोजणी पूर्ण होताच आम्ही तात्काळ जागा ताब्यात घेणार आहोत.”
श्वेता दारुणकर, मुख्य भूसंपादन अधिकारी, पुणे महापालिका

“प्रशासन मार्च २०२७ ची डेडलाईन देत आहे, पण जागेवर अजूनही घरे आणि दुकाने आहेत. मोजणीच झाली नसेल तर रस्ता वेळेत कसा पूर्ण होणार? महापालिकेने भूसंपादनाचे स्पष्ट वेळापत्रक जाहीर करावे.”
संपादक:- विजयसिंह गायकवाड

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!