हडपसर विषारी दारू प्रकरण : निष्काळजीपणाबद्दल तीन पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

दिपसागर ऑनलाईन पोर्टल सेवा:
पुणे, (प्रतिनिधी) : हडपसर परिसरातील विषारी दारू प्रकरणानंतर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कठोर भूमिका घेत संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई केली आहे. या प्रकरणात कर्तव्यात हलगर्जीपणा व आवश्यक दक्षता न घेतल्याचे प्राथमिक चौकशीत निदर्शनास आल्याने हडपसर पोलीस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) सिकलगर आणि पोलीस उपनिरीक्षक मुलानी यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे.
विषारी दारूमुळे घडलेल्या घटनेने शहरात खळबळ उडाली असून, या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. संबंधित भागातील अवैध दारूविक्री, स्थानिक पातळीवरील नियंत्रण व्यवस्था आणि पोलीस यंत्रणेच्या कामकाजाची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तपासणी केली जात आहे.पोलीस प्रशासनाने या घटनेकडे अत्यंत गांभीर्याने पाहिले असून, कर्तव्यात कसूर करणाऱ्या कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला पाठीशी घातले जाणार नाही, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे. चौकशी अहवालानुसार पुढील काळात आणखी प्रशासकीय कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, विषारी दारू प्रकरणातील जबाबदार व्यक्तींविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येत असून, अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
– विजयसिंह गायकवाड
संपादक, दिपसागर न्यूज




