Welcome to Deepsagar News   Click to listen highlighted text! Welcome to Deepsagar News
Uncategorized

पुण्याचा प्रवास भुयारी मार्गांतून! शहरात पाच बोगद्यांना गती; कात्रज, येरवाडा, स्वारगेटला जोडणार

दिपसागर न्यूज ऑनलाईन पोर्टल सेवा:

मुख्य संपादक:विजयसिंह गायकवाड

 पुणे प्रतिनिधी:- पुण्याची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उत्तर-दक्षिण अशा स्वरूपात ५४ किलोमीटरचे पाच भुयारी मार्ग निर्माण करण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा आराखडा अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. शहरातून सध्या शिवाजीनगर ते स्वारगेट दरम्यान भुयारी मार्गातून धावणाऱ्या मेट्रोचा विस्तार कात्रजपर्यंत केला जाणार असताना, आता वाहतुकीसाठी रस्ते अपुरे पडत असल्याने भुयारी मार्गातून वाहने लवकरच धावणार आहेत. पुढील काही दिवसांत सल्लागार नियुक्त करून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या सूचनांनुसार स्वतंत्र कंपनीद्वारे बोगद्यांची निर्मिती केली जाणार आहे.
प्रकल्प आराखडा तयार
महापालिका निवडणुकीच्या प्रचार सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात ‘पाताळलोक’ उभारण्याची घोषणा केली होती. त्यानुसार शहरातील वाढती वाहनसंख्या, अरुंद रस्ते आणि उत्तर-दक्षिण दरम्यानची तीव्र वाहतूक कोंडी लक्षात घेऊन पाच मोठे भुयारी मार्ग उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी ३४ हजार कोटी रुपयांच्या भांडवली गुंतवणुकीचा प्राथमिक आराखडा तयार झाला असून, प्रकल्पासाठी स्वतंत्र उद्देश वहन यंत्रणा (एसपीव्ही) स्थापन करण्यासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी ग्रीन सिग्नल दिला आहे.
या योजनेची प्राथमिक जबाबदारी पुणे महापालिकेवर सोपविण्यात आली असून, बोगदा बांधकामातील आंतरराष्ट्रीय अनुभव असलेल्या सल्लागार कंपन्यांची मदत घेतली जाणार आहे. बोगद्यांचे तांत्रिक सर्वेक्षण, रचना, भूगर्भ तपासणी, वाहतूक नियोजन आणि आर्थिक व्यवहार्यता यासाठी स्वतंत्र सल्लागार नेमले जाणार असून, ही सर्व प्रक्रिया विशेष कंपनीच्या (एसपीव्ही) माध्यमातूनच पूर्ण केली जाणार आहे
पुण्यातील बहुतांश प्रमुख रस्ते पूर्व-पश्चिम धर्तीवर विकसित झाले असले, तरी उत्तर-दक्षिण वाहतूक अजूनही अरुंद रस्ते, टेकड्या आणि मर्यादित जोडरस्त्यांमुळे कोंडीत अडकते. दक्षिण पुण्याकडे जाण्यासाठी उपलब्ध रस्त्यांची क्षमता अपुरी पडत असल्याने नव्या रस्त्यांसाठी जमिनीचा प्रश्न गंभीर झाला आहे. याच पार्श्वभूमीवर जमिनीखालील भुयारी रस्त्यांचा पर्याय पुढे आला आहे. या आराखड्यात कात्रज, येरवडा, खडी मशिन, स्वारगेट, रेसकोर्स, जगताप डेअरी, सिंहगड रस्ता, पाषाण, कोथरूड, औंध, संगमवाडी आणि खडकी हे प्रमुख भाग भुयारी मार्गांनी जोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
नेमका कोठे होणार प्रकल्प ?
येरवडा येथील शास्त्रीनगर ते कोंढवा येथील खडीमशीन चौक, सिंहगड रस्त्यावरील पु. ल. देशपांडे उद्यान ते औंध मार्गे जगताप डेअरीपर्यंत; तसेच खडकी येथून येरवडा येथील शास्त्रीनगर चौक आणि पु. ल. देशपांडे उद्यान येथून शंकरशेठ रस्त्यावरील सेव्हन लव्हज चौक; तसेच बाणेर-पाषाण या विकास आराखड्यातील भुयारी मार्गांचा यामध्ये समावेश आहे. ‘पीएमआरडी’ एने केलेल्या प्राथमिक विकास आराखड्यानुसार या प्रकल्पासाठी ३४ हजार कोटी रुपये खर्च आहे.
पालिकेचे स्वतंत्र दोन बोगदे
राज्य सरकारच्या पाच भुयारी मार्गांव्यतिरिक्त पुणे महापालिकेकडून स्वतंत्रपणे आणखी दोन बोगदा प्रकल्प राबविण्याची तयारी सुरू आहे. पाषाण-कोथरूड आणि हिंगणे धनकवडी या दोन मार्गांवर स्वतंत्र बोगदे उभारण्याचा महापालिकेचा विचार आहे, त्यासाठी प्राथमिक हालचाली सुरू झाल्या आहेत.
एसपीव्ही’वरच प्रकल्पाचा भर
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत ३४ हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी महापालिकेने पुढाकार घ्यावा, अशा सूचना फडणवीस यांनी दिल्या आहेत. मात्र, त्याचवेळी पालिकेच्या अर्थसंकल्पावर त्याचा बोजा पडू नये, या दृष्टीने स्वतंत्र कंपनीमार्फत त्याची अंमलबजावणी करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे आगामी काळात या सर्व बोगद्यांच्या अंमलबजावणीसाठी ‘पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’ प्रमाणे स्वतंत्र कंपनी स्थापन केली जाण्याची चिन्हे आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!