Welcome to Deepsagar News   Click to listen highlighted text! Welcome to Deepsagar News
Uncategorized

पुणे महापालिका निवडणूक : शहरात अभूतपूर्व बंदोबस्त, 12 हजार पोलिस तैनात; 125 संवेदनशील इमारतींवर करडी नजर

दिपसागर न्यूज ऑनलाईन पोर्टल सेवा:

पुणे शहर (प्रतिनिधी) : पुणे महापालिका निवडणुकीसाठी गुरुवारी (दि. 15) मतदान होणार असून, ही प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडावी यासाठी पुणे पोलिसांकडून शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहरातील 125 संवेदनशील इमारतींवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले असून, पूर्वी घडलेल्या घटनांचा आढावा घेऊन पोलिसांनी ही सुरक्षा योजना आखली असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.
मतदानाच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष सुरक्षा आराखडा राबवण्यात येत आहे. संवेदनशील मतदान केंद्रांवर अतिरिक्त पोलिस अधिकारी व अंमलदार तैनात करण्यात आले असून, सतत पेट्रोलिंग, क्यूआरटी (जलद प्रतिसाद पथके) आणि स्ट्रायकिंग फोर्स सज्ज ठेवण्यात आले आहेत. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास तत्काळ कारवाई करण्यात येणार आहे.
शहरात 12 हजारांहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त
मतदान प्रक्रियेसाठी शहरात वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून पोलिस अंमलदारांपर्यंत 12 हजारांहून अधिक पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. संवेदनशील मतदान केंद्रांवर विशेष लक्ष ठेवले जाणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त पंकज देशमुख, संजय पाटील, मनोज पाटील व राजेश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक झोनमध्ये पोलिस उपायुक्तांच्या देखरेखीखाली बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच, बाहेरील जिल्ह्यांतूनही अतिरिक्त पोलिस बंदोबस्त मागवण्यात आला असून, त्यामध्ये वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.
चारस्तरीय सुरक्षा व्यवस्था
शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर चारस्तरीय सुरक्षा व्यवस्था राबवण्यात येणार आहे. यामध्ये पोलिस अंमलदार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस आयुक्त आणि उपायुक्त स्तरावरील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
कोणताही अनुचित प्रकार, वाद किंवा गोंधळ होऊ नये यासाठी स्थानिक पोलिस ठाण्यांसह गुन्हे शाखेची विशेष पथके सतर्क ठेवण्यात आली आहेत.
एका दृष्टीक्षेपात सुरक्षा बंदोबस्त
पोलिस आयुक्त – 1
सहआयुक्त – 1
अपर पोलिस आयुक्त – 4
पोलिस उपायुक्त – 14
पोलिस अधिकारी व अंमलदार – 7,000
होमगार्ड – 3,000
एसआरपीएफ – 4 कंपन्या
बाहेरून मागवलेले अधिकारी-कर्मचारी – 1,500
दुचाकी पेट्रोलिंग – 500 कर्मचारी
क्यूआरटी – 8 पथके
3,983 मतदान केंद्रांवर पोलिस तैनाती
पुणे शहरात एकूण 3 हजार 983 मतदान केंद्रे असून, प्रत्येक केंद्रावर किमान एक पोलिस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहे. 913 इमारतींमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार असून, त्या ठिकाणी प्रत्येकी दोन पोलिस अंमलदार नियुक्त केले आहेत.
शहरात 454 झोन तयार करण्यात आले असून, संबंधित झोनमध्ये वरिष्ठ पोलिस निरीक्षक व सहायक पोलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. संवेदनशील इमारतींवर एक अधिकारी आणि पाच पोलिस कर्मचारी तैनात असतील.
आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी 8 क्यूआरटी सतत सज्ज, तसेच 6 अतिवरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येकी 50 पोलिस अंमलदारांचे स्ट्रायकिंग पथक तैनात ठेवण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!