कोंढव्यात अवैध सावकारीचा ‘भस्मासूर’; महिलेचा विनयभंग अन् जिवे मारण्याची धमकी, तरीही पोलिसांकडून गुन्हेगारांना ‘अभय’?
पोलीस आयुक्त कार्यालयासमोर उद्या रिपब्लिकन परिवर्तन सेनेच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन

दिपसागर न्यूज ऑनलाईन पोर्टल सेवा:
पुणे : कोंढवा परिसरातील काकडे वस्ती गल्ली क्रमांक २ येथे अवैध सावकारी करणाऱ्या सावित्री यल्लाप्पा गायकवाड यांच्या कुटुंबाच्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका गरीब कुटुंबाच्या घरात घुसून धारदार हत्यारे दाखवत धमकी देणे, महिलेला शिवीगाळ करणे तसेच तिच्या तरुण मुलीची छेड काढल्याचा गंभीर आरोप या कुटुंबावर करण्यात आला आहे.
या प्रकरणी तक्रार देऊनही कोंढवा पोलीस ठाण्याकडून गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचा आरोप करत उद्या ९ मार्च रोजी पुणे पोलीस आयुक्त कार्यालयासमोर रिपब्लिकन परिवर्तन सेनेच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काकडे वस्ती येथील रहिवासी वर्षा किशोर कांबळे यांनी घरगुती गरजेसाठी दोन वर्षांपूर्वी सावित्री यल्लाप्पा गायकवाड यांच्याकडून २० हजार रुपये घेतले होते. ही रक्कम टप्प्याटप्प्याने परत करूनही आरोपींकडून २० टक्के दराने अवैध व्याजाची मागणी करत सतत दमदाटी व त्रास दिला जात असल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे.
तक्रारीनुसार सावित्री गायकवाड, विकास गायकवाड, नताशा गायकवाड, पायल गायकवाड तसेच दोन अनोळखी साथीदार हे रात्रीच्या वेळी पीडित महिलेच्या घरात बेकायदेशीरपणे घुसले. त्यांच्या हातात लोखंडी पाईप, कोयता व इतर धारदार हत्यारे असल्याचे सांगितले जाते.
या वेळी “पैसे दे नाहीतर संपूर्ण कुटुंबाला जीवे मारू” अशी धमकी देत घरात दहशत निर्माण करण्यात आली. मद्यधुंद अवस्थेत आलेल्या आरोपींनी पीडित महिलेच्या तरुण मुलीशी गैरवर्तन करून तिची छेड काढल्याचा आरोप करण्यात आला आहे.
काकडे वस्तीत सावकारांचा दबदबा
स्थानिक नागरिकांच्या मते गायकवाड कुटुंब हे काकडे वस्ती परिसरात बेकायदेशीर सावकारीचा व्यवसाय करत असून या भागात त्यांची दहशत निर्माण झाली आहे. गरीब व गरजू लोकांना जास्त व्याजाने पैसे देऊन त्यांच्याकडून दमदाटी, धमक्या आणि मारहाण करून पैसे वसूल केले जात असल्याचे सांगितले जाते.
इतकेच नव्हे तर काही दिवसांपूर्वी विकास गायकवाड व त्याच्या भावांनी रात्रीच्या वेळी परिसरात धारदार हत्यारे बाळगून अनेक नागरिकांच्या गाड्यांची तोडफोड केल्याप्रकरणी कोंढवा पोलीस स्टेशन येथे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती स्थानिकांनी दिले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
दरम्यान राज्यात वाढत्या अवैध सावकारीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अशा बेकायदेशीर सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
पीडित व्यक्ती पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आल्यास तक्रार तात्काळ नोंदवून सावकारी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
आंदोलनाचा इशारा
मात्र या प्रकरणात कारवाई न झाल्यामुळे संताप व्यक्त करत रिपब्लिकन परिवर्तन सेनेच्या वतीने उद्या ९ मार्च रोजी पुणे पोलीस आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
या प्रकरणात घरात घुसखोरी, महिलेला छेडणे, जीवे मारण्याची धमकी, धारदार हत्यारे बाळगणे तसेच बेकायदेशीर सावकारी या गंभीर गुन्ह्यांखाली तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे




