Welcome to Deepsagar News   Click to listen highlighted text! Welcome to Deepsagar News
Uncategorized

कात्रज–कोंढवा रोडवर बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षांचा सुळसुळाट; क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी, स्थानिक वाहतूक पोलिसांचे डोळेझाक?

दिपसागर न्यूज ऑनलाइन पोर्टल सेवा:

पुणे कोंढवा (प्रतिनिधी):  खडीमशीन चौक ते इस्कॉन मंदिर, इस्कॉन मंदिर ते कात्रज आणि कात्रज ते इस्कॉन मंदिर या संपूर्ण पट्ट्यात रिक्षाचालक  राजरोसपणे, सरसपणे आणि बेधडकपणे बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करत असल्याचे चित्र उघडकीस येत आहे. तीन आसन क्षमतेच्या रिक्षांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी कोंबून, भरधाव वेगाने रिक्षा पळवल्या जात आहेत. काही रिक्षांमध्ये मागील बाजूस चार ते पाच प्रवासी कोंबले जात असून चालकाच्या डाव्या–उजव्या बाजूलाही प्रवासी बसवून धोकादायक पद्धतीने वाहतूक केली जात आहे. परिणामी कात्रज–कोंढवा रोड हा अपघातांचा ‘हॉटस्पॉट’ बनत चालला असून, निष्पाप प्रवाशांचे जीव धोक्यात येत आहेत. “जिथे नियम मोडले जातात, तिथे अपघात वाढतात” ही म्हण इथे अक्षरशः खरी ठरत आहे.

नियम धाब्यावर, जीव धोक्यावर
वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून अवैध प्रवासी वाहतूक सुरू असल्याने रस्त्यांवर अराजकतेचे वातावरण आहे. सकाळ-संध्याकाळ गर्दीच्या वेळेत रिक्षांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी कोंबले जातात. रिक्षाचालकांची बेदरकार ड्रायव्हिंग, अचानक कट मारणे, चुकीच्या बाजूने वाहन चालवणे यामुळे रोजच किरकोळ अपघात घडत आहेत. या बेकायदेशीर वाहतुकीचा सर्वाधिक फटका महिला, लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना बसत असून, त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

दादागिरीचा माज: जाब विचारला तर दमदाटी, उलट उत्तरे!
या भागात रिक्षाचालकांची मनमानी इतक्या टोकाला गेली आहे की नागरिकांनी जाब विचारला, अवैध वाहतुकीला विरोध केला, तर शिवीगाळ, धमकी देणे, दमदाटी करणे आणि उलट उत्तरे देणे असे प्रकार घडत आहेत. काही वेळा “मीटरने जा, नाहीतर दुसऱ्या रिक्षाने जा” अशी उद्धट उत्तरे देत प्रवाशांना हुसकावले जाते. रिक्षाचालक व प्रवाशांमधील वादविवाद आता रोजचेच झालेले आहेत.

हप्त्यांची सावली: कात्रज–कोंढवा वाहतूक शाखांचे दुर्लक्ष?
कोंढवा वाहतूक शाखा आणि कात्रज वाहतूक शाखेकडे वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याने संशयाचे सावट अधिक गडद झाले आहे. मोटारसायकल व इतर खासगी वाहनांवर किरकोळ कारणासाठी सक्तीने कारवाई होत असताना, अशा अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांवर मात्र ठोस कारवाई होत नसल्याचे चित्र आहे. अनेक रिक्षाचालक गणवेशाविना, बॅज नसताना, वैध वाहनचालक परवाना नसतानाही प्रवासी वाहतूक करताना दिसतात.
कोंढवा आणि  कात्रज वाहतूक नियंत्रण शाखा पोलिस निरीक्षक, व  सहाय्यक पोलिस आयुक्त आणि संबंधित वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात हा सगळा प्रकार घडत असतानाही ठोस कारवाई न झाल्याने “वरपर्यंत हप्ता पोहोचतो का?” असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
या पार्श्वभूमीवर Pune Traffic Police यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडत असून, दिवसेंदिवस वाहतूक पोलिसांची प्रतिमा मलिन होत असल्याची भावना नागरिकांमध्ये वाढत आहे.

सार्वजनिक सेवेचे नुकसान, प्रशासनालाही आर्थिक फटका

या अवैध रिक्षाराजाचा थेट फटका PMPMLच्या उत्पन्नावर पडत असून, पुणे महानगरपालिका परिवहन महामंडळाच्या बससेवेचे मोठे नुकसान होत आहे. वाजवी दरात नियमित फेऱ्या असूनही प्रवासी अवैध रिक्षांकडे वळत असल्याने पीएमपीएमएलच्या उत्पन्नात घट होत असल्याची चर्चा आहे.
त्याचबरोबर, अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या अनेक रिक्षांकडे पीव्हीसी नाही, आवश्यक कागदपत्रे नाहीत, वाहनकर व इतर कर नियमित भरले जात नाहीत. परिणामी RTO Puneकडे जमा होणारा महसूलही बुडत असून, प्रशासनालाही याची आर्थिक झळ बसत आहे. आरटीओच्या नियमानुसार रिक्षाचालकाकडे वैध वाहनचालक परवाना, बॅज, गणवेश, वाहनाची पीव्हीसी, नोंदणी कागदपत्रे, विमा आणि कर भरलेले असणे बंधनकारक आहे. मात्र, प्रत्यक्षात या नियमांची उघड पायमल्ली होताना दिसत आहे.

कारवाई फक्त चलानापुरती?
वाहतूक पोलिसांकडून अधूनमधून एखाद्या वाहनावर चलानाची कारवाई होत असली, तरी बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षांच्या टोळ्यांवर धडक कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष वाढत आहे.

या गंभीर प्रकाराकडे पुणे शहराचे वाहतूक पोलिस उपायुक्त लक्ष देतील का? ठोस व कडक कारवाई होणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
कात्रज–कोंढवा रोडवरील बेकायदेशीर प्रवासी वाहतूक, दमदाटी, हप्ता वसुली आणि कथित मिलीभगत यावर वाहतूक पोलीस आयुक्तांनी लक्ष घालून स्वतंत्र चौकशी करावी, अशी जोरदार मागणी होत आहे. कात्रज व कोंढवा वाहतूक शाखेतील संबंधित पोलिस निरीक्षक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!