महाराष्ट्र
Eknath Shinde : प्रताप सरनाईक मिरा भाईंदरमध्ये विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करणार, इथं भगवा फडकणार ही काळ्या दगडावरची रेघ : एकनाथ शिंदे

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मीरा भाईंदरमध्ये प्रताप सरनाईक विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करतील, असं म्हटलं.
मिरा भाईंदर : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिरा भाईंदरमध्ये शिवसेनेच्या सभेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी बोलताना म्हटलं की एवढी गर्दी बघून, विरोधकांच्या पोटात गोळा आला असेल. बाळासाहेब म्हणायचे मुंबईत भगवा, ठाण्यात भगवा मग मिरा भाईंदर मध्ये का नाही, म्हणून प्रताप सरनाईकांनी विडा उचललाय की मिरा भाईंदर मध्ये भगवा फडकवला पाहिजे. एकूण उमेदवार 81 आहे. म्हणजे 9 नंबर हा माझा लकी नंबर आहे.प्रताप सरनाईक येथे विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करणार आहेत. इथं भगवा फडकणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.
विकासाचं क्रेडिट शिवसेनेचं
आम्ही काही ठिकाणी युती सोबत लढत आहे. दुर्भाग्यानं इथं युती झाली नाही. मला कुणावरीही आरोप करायचा नाही. मी विकासावर बोलणार, आमचा अंजेडा विकासाचा आहे. दुसरा कुणाचा काय अंजेडा आम्हाला माहिती नाही, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
मिरा भाईंदरमध्ये केलेल्या विकासाचं क्रेडिट शिवसेनेचं आहे. 10 ते 12 वर्षात मिरा भाईंदर बदलतंय.३१८८ कोटी तीन वर्षात मी मिरा भाईंदरला दिले. अनेक योजना केल्या, मिरा भाईंदरमध्ये अनेक पदे भरली. मेट्रोमुळे मिरा भाईंदर मुंबईला जोडला जाईल.
येथील टोल नाका आपण काढून टाकला आहे. आम्ही घोषणा करत नाही काम करुन दाखवतो, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
मिरा भाईंदर मिनी इंडिया आहे. सर्व जाती धर्माचे लोक येथे राहतात. शिवसेना येथे सर्वांना एकत्र घेवून आली आहे.शिवसेनेचा एकच नारा आहे – अब मिरा भाईंदर हमारा है. आम्ही सर्व समाजासाठी भवन बनवले आहे.मी देशाचा पहिला मुख्यमंत्री होतो ज्याने गो मातेला राज्य मातेचा दर्जा दिला आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
15 तारखेला जय श्रीराम बोलून धनुष्य बाणाचं बटन दाबा. शंकराचार्य यांनी मला गो मातेच्या पुत्राचा दर्जा दिला आहे. मला अभिमान आहे. या शहरात अनेक समस्या आहेत. पाण्याची समस्या आहे. टॅंकर आहेत. पाणी समस्या सोडवणार आहे. सुर्यासारख्या योजना रोखण्याच काम केलं आहे. त्याला पाणी पाजण्याच काम करा, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी नरेंद्र मेहतांवर टीका केली.
में कमिन्टमेंट करत नाही, एकदा केली तर मी माझं पण ऐकत नाही. मी 2022 मध्ये मोठं ऑपरेशन केलं होतं. महाराष्ट्रात सत्ता पालट केलं होतं. बाळासाहेबाचं स्वप्न साकार केलं होतं. आम्ही विचारधारेबरोबर जाणारे आहोत. आम्हाला सत्ता आणि खुर्चीची लालच नाही, असं एकनाथ शिंदे म्हणाले.